Royal Entertainmentटॉप पोस्टमुख्य बातम्या

‘प्रेरणा प्रकल्पा’तून आतापर्यंत सुमारे ९० हजार शेतकऱ्यांचे समुपदेशन

0

राज्यातील शेतकरी आत्महत्याग्रस्त १४ जिल्ह्यांमध्ये ‘प्रेरणा प्रकल्पा’च्या माध्यमातून आतापर्यंत तीन वर्षात सुमारे ९० हजारापेक्षा जास्त शेतकऱ्यांचे समुपदेशन करून त्यांना नैराश्यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. मानसिक आरोग्य कार्यक्रमांतर्गत असलेल्या १०४ क्रमांकाच्या हेल्पलाईनवर आतापर्यंत सुमारे २६ हजार कॉल्स आले आहेत.

मराठवाड्यातील औरंगाबाद, बीड, जालना, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद, परभणी आणि विदर्भातील अकोला, अमरावती, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ आणि वर्धा अशा १४ शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांमध्ये २०१५ पासून प्रेरणा प्रकल्प राबविण्यात येत आहे. या प्रकल्पांतर्गत नैराश्यग्रस्त शेतकऱ्यांना समुपदेशन करून त्यांना त्यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला जातो. मानसोपचार तज्ज्ञ, सामाजिक कार्यकर्ते, आशा कार्यकर्त्यांच्या माध्यमातून हा प्रकल्प राबविला जात आहे.

Loading...

प्रेरणा प्रकल्पाच्या माध्यमातून समुपदेशन कक्षाचे विस्तारीकरण तसेच आशा वर्कर्स यांना मानसिक आजारासंदर्भात प्रशिक्षण दिले जाते. गेल्या तीन वर्षात सुमारे दोन हजार वैद्यकीय अधिकारी, दहा हजार निमआरोग्य कर्मचारी आणि २० हजार आशा वर्कर्स यांना मानसिक आजाराबाबत प्रशिक्षण देण्यात आले आहे. त्यांच्या माध्यमातून या १४ जिल्ह्यांमध्ये सर्वेक्षण आणि समुपदेशन केले जात आहे, असे आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

४२ लाख ५५ हजार घरांचे सर्व्हेक्षण – आरोग्यमंत्री

डिसेंबर २०१८ अखेर वैद्यकीय अधिकारी, आरोग्य कर्मचारी आणि आशा कार्यकर्ती अशा १२ हजार ७०० जणांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. या शेतकरी आत्महत्याग्रस्त १४ जिल्ह्यांमध्ये २० हजार ९१३ आशा वर्कर्स कार्यरत आहेत. त्यांना तालुकास्तरावर मानसिक आरोग्य व त्या अनुषंगिक आजाराबद्दल प्रशिक्षण देण्यात आले आहे.

प्रेरणा प्रकल्पांतर्गत आशा वर्कर गावातील घरांचे सर्वेक्षण करून जोखमीचे कुटुंब व नैराश्यग्रस्त संशयित रुग्णांची माहिती घेते. त्या नैराश्यग्रस्त व्यक्तीच्या समुपदेशनासाठी आशा वर्कर १०४ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधते. तज्ज्ञ समूपदेशाकडून त्या व्यक्तीचे वर्गीकरण करून घेते आणि त्यानंतर आवश्यकते प्रमाणे त्या नैराश्यग्रस्त व्यक्तीला प्राथमिक आरोग्य केंद्र अथवा ग्रामीण रुग्णालय किंवा उपजिल्हा रुग्णालयात रूग्णवाहिकेमार्फत संदर्भित केले जाते. आतापर्यंत आशा वर्कर्सच्या माध्यमातून पहिल्या सहामाहित ४२ लाख ५५ हजार ४४२ घरांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे तर सध्या दुसऱ्या सहामाहीतील सर्वेक्षणाची प्रक्रिया सुरू असल्याचे आरोग्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.

प्रेरणा प्रकल्पांतर्गत मानसिक आजारासोबत उच्च रक्तदाब, मधुमेह, हृदयविकार, पक्षाघात, कर्करोग, उदासीनता आणि व्यसनाधिनता आदी बाबतही तपासणी केली जाते. त्यात डिसेंबर अखेर बाह्यरुग्णांची संख्या सुमारे २६ लाख ७५ हजार २२४ इतकी आहे.

या प्रकल्पांतर्गत डिसेंबर २०१८ पर्यंत सुमारे ९० हजार शेतकऱ्यांचे समुपदेशन करण्यात आले आहे. त्यामध्ये आठ हजार जणांवर व्यक्तिगतरित्या मानसिक उपचार करण्यात आले तर सहा हजार जणांवर सामूहिक उपचार करण्यात आले आहेत. राज्य शासनाच्या मानसिक आरोग्य कार्यक्रमांतर्गत असलेल्या १०४ क्रमांकाच्या टोल फ्री हेल्पलाईनवर गेल्या तीन वर्षात २५ हजाराहून अधिक कॉल आले आहेत. या प्रकल्पाचे टाटा सामाजिक विज्ञान संस्थेच्या माध्यमातून मूल्यमापन करण्यात येत असून महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना विविध आरोग्य सेवा देण्यात येत आहेत, असे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.

Loading...

खर्चाचे ओझे कमी करणाऱ्या सामूहिक विवाहासारख्या उपक्रमांची गरज – मुख्यमंत्री

Previous article

अखेर भाजप शिवसेनेचं जमलं; आजपासून ‘मिले सूर मेरा तुम्हारा’

Next article

You may also like

Comments

Comments are closed.