महाराष्ट्र

कश्मीर प्रश्नावर नगरमध्ये बुधवारी सहविचार सभेचे आयोजन

0

अहमदनगर, 18 फेब्रुवारी (हिं.स.) – पुलवामा येथील अतिरेक्यांनी केलेल्या क्रूर हल्ल्यानंतर नागरिकांनी आपला निषेध आणि संताप रस्त्यावर येऊन सुयोग्य पद्धतीने व्यक्त केला. या तात्कालिक प्रतिक्रियेच्या पलीकडे जाऊन कश्मीर मधील दहशतवादाच्या प्रश्नावर नागरिक म्हणून काय करता येईल,या विषयावरील सहविचार सभेचे आयोजन नगरमध्ये करण्यात आली आहे.येत्या २० फेब्रुवारी रोजी प्रतिसाद केंद्र या ठिकाणी ही सभा होत आहे.स्नेहालय संस्थेचा युवानिर्माण प्रकल्प आणि भारत जोडो उपक्रम यांनी या सभेचे आयोजन केले आहे.कश्मीर मधील दहशतवाद संपवण्यासाठी लष्करी, राजकीय, आर्थिक आणि राजकीय उपयोजनांची आवश्यकता आहे.या मुद्द्यांवर शासन स्तरावरून वेगाने उपाययोजना होत आहेत.

तथापि काश्मीर खोऱ्यातील नागरिकांच्या मनातील भारत आणि भारतीयांबद्दलची द्वेषभावना आणि अविश्वास दूर करण्यासाठी नागरिकांच्या स्तरावरही काम करण्याची आवश्यकता आहे.यासंदर्भात मागील चार वर्षांपासून स्नेहालय परिवार भारत जोडो अभियान राबवित आहे.पाकिस्तान सीमेवरील,श्रीनगरच्या पश्चिमेकडील शरीफाबाद गावाच्या पंचक्रोशीतील दहशतग्रस्त २६ परिवारातील मुलांना या उपक्रमाच्या अंतर्गत स्नेहालय संस्थेत प्रवेश देण्यात आला आहे.या मुलांना दर्जेदार इंग्रजी माध्यमातील शिक्षण स्नेहालय विनामूल्य देते.

Loading...

भारतीय संस्कार,देशप्रेम आणि देशाभिमान त्यांच्यात रुजवून,रोजगार कौशल्य देऊन त्यांना पुन्हा सीमावर्ती भागात स्थायिक करण्याची दीर्घकालीन योजना स्नेहालय राबवित आहे.सध्या नवी दिल्ली येथे दूरसंचार विभागात उपसंचालक म्हणून कार्यरत असलेले मूळचे अहमदनगरचे सनदी अधिकारी सीए सौरभ देशमुख आणि नगर मधील सीए गौरव गुगळे यांनी या प्रकल्पाची मुहूर्तमेढ रोवली. नगरमधील साईदीप रुग्णालयाचे डॉ. एस.एस.दीपक आणि ज्योती दीपक या दांपत्याने काश्मीरमधील या बालकांसाठी भारत जोडो भवन स्नेहालय संस्थेत उभारून दिले.या भवनात काश्मिरी बालकां साठी स्वतंत्र ग्रंथालय, अभ्यासिका,संगणक आणि संशोधन केंद्र,सांस्कृतिक आणि क्रीडा विभाग अशा सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

हा प्रकल्प अधिक व्यापक प्रमाणात राबविण्यासाठी आणि सीमावर्ती भागातील काश्मिरी नागरिकांशी थेट संवाद निर्माण करण्यासाठी भारत जोडो प्रकल्प सध्या प्रयत्नशील आहे.सहविचार सभेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांनी ९०११०२६४७२ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन युवा निर्माण प्रकल्प आणि भारत जोडो उपक्रम यांनी केले आहे.

Loading...

सुशीलकुमार शिंदे यांची बदनामी करणा-या तिघांवर गुन्हा दाखल

Previous article

युवा नेते रोहीत पवार व रविकांत तुपकर यांच्यात एक तास चर्चा

Next article

You may also like

Comments

Comments are closed.